गेली ३ टर्म सातारा- जावली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राजघराण्यातील वंशज असलेले आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले करत आहेत. आत्ता ते या मतदारसंघात चौथ्यांदा निवडणूक लढवत असून या निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागणार, हे सर्वश्रुत होतंच. या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्या विरोधात अमित कदम उभे राहिले. आधी काँग्रेसमध्ये असलेले अमित कदम नंतर राष्ट्रवादीत गेले. त्यावेळी आमदार असलेल्या शिवेंद्रराजेंच्या मदतीने ते जिल्हा परिषद सदस्य झाले, शिक्षण सभापतीही झाले. त्यांनतर कदम भाजपामध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपमध्ये असेलेले दीपक पवार हे आ. शिवेंद्रराजेंच्या विरोधात आमदारकी लढवत होते. अचानक महाराष्ट्राचे राजकारण बदलले आणि शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेले. सर्व गणितं फिरली. दीपक पवार लगेच राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादीतून शिवेंद्रराजेंच्या विरोधात लढले. प्रत्येक वेळी दीपक पवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
सध्याची राजकीय परिस्थितीही वेगळीच होती. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवारांनी घड्याळ असलेल्या राष्ट्रवादीवर कब्जा मिळवला तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तुतारीची राष्ट्रवादी मिळाली. याच कालावधीत अमित कदम अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कर्ते झाले. त्यांना वाटलं घड्याळ आपल्याला मिळेल आणि आपण आमदारकी लढवू पण, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी महायुती करून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शरद पवार शिवेंद्रराजेंच्या विरोधात हमखास उमेदवार देणारच असा कयास अमित कदमांनी बांधला पण, दीपक पवार हे शरद पवार गटातच असल्याने तुतारी त्यांच्याच नावापुढे वाजणार अशी दाट शक्यता होती. असे असतानाही कदमांनी तिकिटासाठी शरद पवारांचेही पाय धरले परंतु, काहीही उपयोग झाला नाही. पवारांनी सातारा- जावलीमध्ये अजिबात रस दाखवला नाही.
आता काय करायचं? असा प्रश्न निर्माण झाला असताना सातारा जावलीची जागा महाविकास आघाडीने उबाठा गटाच्या सेनेला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कदमांनी वेळ न दवडता मातोश्री गाठली आणि अखेर उमेदवारीची मशाल मिळवलीच. आता प्रश्न राहतो निवडणुकीच्या रणसंग्रामाचा! तसं पाहिलं तर शिवेंद्रराजे हे मुरलेले आणि मात्तबर नेतृत्व! सलग ४ टर्म आमदार राहिलेल्या शिवेंद्रराजेंनी आपला सातारा- जावली गड फारच मजबूत बांधून ठेवला आहे. संपूर्ण मतदारसंघात त्यांचे असंख्य सरदार, शिलेदार आणि लाखो मावळ्यांची फौज तैनात आहे. अशा या एकहाती रणांगणात एकदम नवख्या घुसखोराने घुसखोरी करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच म्हणावे लागेल. असो, तरीही लढण्याची मशाल पेटवून हा पट्ट्या रान तापवू लागला खरा पण, मोजकेच खलाशी घेऊन हा कॅप्टन बिनशिडाचेच जहाज महासागरात फिरवू लागला. आता हे जहाज सागराच्या मध्यभागी पोहचले. प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उमेदवारी दाखल झाल्यापासून ते आजपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे हे बिनशिडाचे जहाज किती बुडणार, हे २३ तारखेच्या दिवसाने दाखवले!
शिवेंद्रराजेंचा गड भक्कम आणि मजबूतच आहे. या गडाचा एक बुरुजही जागचा हलणे फारच कठीण आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. विकासकामांच्या जोरावर आणि तगडा जनसपंर्क, मतदारसंघातील लोकांच्यासाठी नेहमीच उपलब्ध असणे, लोकांच्या अडीअडचणी सोडवणे आदी बाबींमुळे शिवेंद्रराजेंचा गड कोणी काबीज करेल, यात किंचितही शक्यता नव्हती! मतदानाचा दिवस उजाडला! सातारा- जावली गडावर पुन्हा एकदा कमळाचा झेंडा फडकणार हे सांगण्यासाठी कोणा जोतिष्याची गरज नव्हती पण, मशाल कितीसा उजेड पाडणार, का भरलेल्या डिपॉझिटवर काजळी चढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मतमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीपासूनच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी विजयी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीअखेर आ. शिवेंद्रसिंहराजेंना १ लाख ७६ हजार ८४९ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर १ लाख ४२ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून विजय साजरा केला तर, अमित कदम यांना केवळ ३४ हजार ७२३ मते मिळाली. कदमांसह उर्वरित सर्वच उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले. आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या कदमांची मशाल पेटण्याआधीच विझली! राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा- जावलीचा गड अभेद्य ठेवला! अमित कदमांची मात्र फार मोठी गोची झाली. एकवेळ नारळाच्या झाडावरून पडलं तरी फारसं लागत नाही पण, हरभऱ्याच्या झाडावरून पडल्यावर खूप लागतं, हेच खरं!
✒️- अमर मोकाशी.